न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड, दत्तनगर येथील महात्मा फुले उद्यानातील सुमारे २३ मोठ्या झाडांची कत्तलीप्रकरणी खासगी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, कामात हलगर्जीपणा केल्याने पालिकेच्या उद्यान विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी शुक्रवारी (दि. १८) सांगितले.
उद्यान विभागाने मंगळवारी (दि. १५) त्या झाडांचा पंचनामा केला. त्यामध्ये फायकस १४, पेल्टाफोरम ६, चिंच १, सुबाभूळ १, वड ११ अशा एकूण २३ झाडे तोडण्यात आल्याचे निर्दशनास आले. लाकडे चोरीच्या उद्देश्याने परवानगी न घेता उद्यानात प्रवेश करून ती लाकडे टेम्पोतून नेण्यात आली. या प्रकरणी ठेकेदार इशार जफर शा (रा. बौध्दनगर, सेक्टर २२, निगडी) याच्याविरुध्द पिंपरी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी तक्रार दिली आहे. तसेच, कामात हयगय व हलगर्जीपणा केल्याने त्या उद्यानातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. या पूर्वी नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडियमधील अनेक झाडे विनापरवाना तोडून त्याची विक्री केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले होते.
वृक्ष प्राधिकरण समितीसमोर धोकादायक झाडे तोडण्याबाबत परवानगीचे अर्ज येतात. त्या झाडांचे प्रत्यक्ष फोटो, अडथळा व धोका आदी बाबी पडताळणी करून घेण्यात येणार आहे. त्यानंतरच गरज असल्यास वृक्ष तोडीस परवानगी दिली जाणार आहे. झाडे न कापता त्याचे पुनर्रोपण करण्यावर भर दिला जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले. त्यासंदर्भात कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या सक्त सूचना उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यापुढे विनापरवाना झाडे तोडल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.















