न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- मराठी गझल या काव्यप्रकाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या गझलपुष्प (पिंपरी-चिंचवड) या संस्थेचा चौथा वर्धापनदिन रविवार (दि. २७) रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे, पिंपरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात उद्योजक विलास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश लुणावत, सागर शिंदे यांची उद्घाटक म्हणून तर उद्योजक अभय पोकर्णा, टाटा मोटर्समधील व्यवस्थापक संजय चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते रणजित कलाटे यांची प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य उपस्थिती राहील.
पुलगाव येथील गझलकार रूपेश देशमुख यांना ‘गझलपुष्प २०२२ पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून गझलपुष्प गझललेखन स्पर्धा पुरस्कार २०२२ च्या विजेत्यांना सन्मानित करण्यात येईल. प्रशांत पोरे संपादित ‘गझल पिंपरी-चिंचवडची’ या संपादकीय संग्रहाचे आणि निशांत पवार लिखित ‘ऋतू माझ्या जिव्हाळ्याचे’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. ‘मराठी गझलमधील स्थित्यंतरे’ या विषयावरील चर्चासत्रात प्रशांत वैद्य, प्रा.डॉ. अविनाश सांगोलेकर आणि संजय गोरडे हे गझल अभ्यासक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातल्या विविध भागांतील तसेच निमंत्रित स्थानिक गझलकारांचा सहभाग असलेले तीन गझल मुशायरे आणि ‘गझलसंध्या’ ही सांगीतिक मैफल हे या सोहळ्यातील खास आकर्षण असून विनाशुल्क असलेल्या या सोहळ्याचा लाभ सर्व रसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन गझलपुष्प संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
















