- निवडणूक विभागाकडून प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात राबविलेल्या मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेंतर्गत दुबार, मयत अशा सुमारे दोन लाख ८१ हजार ५८९ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक शाखेकडून नुकतीच जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघात राबविलेल्या मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेंतर्गत दुबार, मयत मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. ते वगळून आता सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात असून याठिकाणी पाच लाख १६ हजार ८३६ मतदार आहेत. त्यापाठोपाठ भोसरी मतदारसंघात ५,०५,८८५ तर सर्वांत कमी पिंपरी मतदारसंघात ३,५५,७५८ मतदार आहेत.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रारूप मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येते. या मतदार यादीवर हरकती, सूचना मागविल्या जातात. त्यावर सुनावणी घेऊन ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. या कार्यक्रमानुसार सध्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नाव, पत्त्यांमधील दुरुस्ती, एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात नाव नोंदविणे, मतदार यादीतील दुबार आणि मयत नावे वगळणे आदी कामे हाती घेतली जातात.
दरम्यान, जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दावे व हरकती ८ डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी खास मोहिमा राबविण्यात येणार आहेत, तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
मतदार यादीत नाव कसे तपासाल?
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
















