न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवर नगरसेविका माया बारणे यांनी आगपाखड केली आहे. प्रशासनाच्या मनमर्जी कारभारास वैतागून नगरसेविका माया बारणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर वारंवार तक्रारी करूनही, त्याकडे प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. झोपलेल्या या प्रशासनाला जागे करण्यासाठी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर ‘जागरण गोंधळ’ आंदोलन करणार असल्याची माहिती माया बारणे यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.
बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेरगाव मधील प्रभाग क्रमांक २४ चा काही दिवसांपूर्वी पाहणी दौरा केला होता. या पाहणी दौऱ्यात सर्व्हे नंबर १४ सोलाना हाऊसिंग सोसायटी व सर्व्हे नंबर २७ मध्ये सुखवानी चावला या बांधकाम व्यावसायिकांना सदर ठिकाणी १२ मीटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात नसताना या बांधकाम व्यावसायिकांना कोणत्या आधारे बांधकाम परवानगी बांधकाम विभागाने मंजुरी देण्यात आली. याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. परंतु एक महिना उलटूनही अद्याप त्या प्रकरणाची कोणतीच चौकशी झालेली नाही.
राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केली म्हणून त्यांना शास्तीकर लावला जातो. परंतु ज्या बांधकाम व्यावसायिकांनी अधिकृत परवानगी घेऊन अनाधिकृत बांधकामे केली, अशा बांधकामावरती महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नाही. अशा बांधकाम व्यावसायिक विरोधात फौजदारी खटला भरला जात नाही. महापालिकेच्या नियमानुसार पूर्णत्वाचा दाखला न घेता बांधकाम व्यावसायिकांनी निवासी व अनिवासी वापर केला, तर महापालिकेच्या धोरणानुसार दंड होणे अपेक्षित आहे. परंतु, बऱ्याच बांधकाम व्यवसायिकांनी बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड होणे अपेक्षित आहे. परंतु त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्यांनी कँनबेरी या संस्थेला पाणी पुरवठा विभागातील मीटर रेडींग घेणे तसेच पाणीपट्टी बिल देणे या संस्थेला काम देण्यात आलेले आहे. परंतु या संस्थेविरुद्ध नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. सदर संस्थेवर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे या कामचुकार प्रशासनाला जागे करण्यासाठी नगरसेविका माया बारणे यांनी ‘जागरण गोंधळ’ आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. हे आंदोलन शुक्रवार दि. १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर करणार असल्याचे माया बारणे यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.











