न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रु.) :- संभाजीनगर, बर्ड व्हॅली येथील लेझर शोच्या निविदामध्ये गौडबंगाल आहे. याबाबत नगरसेविका मंगला कदम यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन, आयुक्त व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक रवी लांडगे व आदी उपस्थित होते.
तसेच नगरसेविका मंगला कदम यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील संभाजीनगर, बर्ड व्हॅली येथे लेझर शोच्या कामाचे नियोजन सन २०१५-१६ रोजी करण्यात आले होते व त्या अनुषंगाने त्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये आवश्यक ती तरतूद करण्यात येऊन, निविदा काढण्यात आली होती. परंतु सदरच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने ती निविदा तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधितांकडून १० वेळा सादरीकरण घेऊन लेझर शोच्या डिझाईन मध्ये बदल केले. त्यानंतर स्थायी समितीकडे पाठविली तिथेसुद्धा दोन वेळा विषय तहकूब ठेवला. याबाबत आम्ही मा. आयुक्त व मा. सभापती, स्थायी समिती यांना सदरबाबत लेखी खुलासा मागितला असता, त्यांनी आज अखेरपर्यंत उत्तर दिले नाही. खरेच जर त्यांना सदरचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावयास असते व पारदर्शक पद्धतीने करावयाचे असते, तर आम्ही खुलासा मागितला तेव्हा त्यांनी त्याच वेळी आत्ताचा खुलासा केला असता. आमच्या पत्रकार परिषदेची वाट पाहिली नसती.
आम्ही जर पत्रकार परिषद घेतली नसती तर त्यांनी बिनबोभाट त्यांचा कार्यभाग साधला असता. त्यांनी स्पष्टीकरण केलेल्या निवेदनामध्ये लेझर शोची साईज वाढविलेली आहे व त्यांचे नोझल्स व पंप जर्मन बनावटीचे वापरणार आहेत. हे जुन्या निविदेमध्ये अगोदरच नमूद होते. यात नविन ते काय. तसेच वस्तुस्थिती अशी आहे की, नोझल्स जर्मन बनावटीचे वापरणार आहेत. परंतु, पंप हे देशी बनावटीचे वापरणार आहेत. त्यामुळे परदेशी नोझल्स व देशी पंप यांचा ताळमेळ बसणार का? व हा लेझर शो दर्जेदार होणार? याबाबत शंकाच आहे.
तसेच आमच्या काही सहकार्यांना असे वाटते की, या निविदेतमध्ये कोणाचाही हस्तक्षेप झाला नाही. मग हा अट्टापिटा कशासाठी केला जात आहे. म्हणजेच यानिविदा प्रसिद्धी करण्यात आल्यानंतर या निविदेच्या अटी शर्तीमध्ये निविदाचे एफ. डी. आर. हे रोखीने मनपा कोषागारात, बॅंकात किंवा पोष्टात भरून त्याची पावती मनपाकडे जमा करावयाची आहे. ही अनोखी अट नव्यानेच टाकण्यात आली आहे. यापूर्वीच्या सर्व निविदांची रक्कम ही ऑनलाइन स्वीकारली जात होती. फक्त या निविदामध्येच निविदाची रक्कम ही ऑफलाइन स्वीकारुन त्यांची पावती जमा करण्यास सांगितले आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, जो कोणी निविदा भरेल, त्यांची माहिती सर्व संबंधितांना समजेल व रिंग करणे सोपे जाईल किंवा जो कोणी सदरची निविदा भरणार आहे. त्याची माहिती तात्काळ मिळेल. यात गोपनियतेचा भंग होत नाही का? व भाजपाची ती ऐतिहासिक घोषणा पारदर्शक, स्वच्छ कारभार कुठे गेली? याचाच अर्थ मी केलेल्या आरोपांना पुष्टी मिळत आहे.
पूर्वीच्या निविदाच्या आराखड्यास तीन वर्ष विचार करावा लागतो तर नवीन आराखडा १५ दिवसात, असा मंजूर होतो. अजून विशेष म्हणजे फाउंटन (कारंजे) चा नकाशा एका विशिष्ट कंपनीचा मान्य करून, तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच पूर्वीच्या व आताच्या ऑपरेशन व मेंन्टन्समध्ये प्रचंड तफावत आहे. गेली दोन वर्ष भाजप सत्तेत आहे. परंतु, बोट दाखवण्याजोगा एकतरी प्रकल्प त्यांनी केला आहे काय? माझ्या प्रभागात सोडा, अख्या शहरात एक तरी विकास प्रकल्प त्यांनी दाखवून द्यावा. आमचेच जुने प्रकल्पांची नावे व त्यामध्ये बदल करून, ते रंगरंगोटी करीत आहेत आणि विकासाच्या गप्पा मारत आहेत, असे या पत्रात कदम यांनी नमूद केले आहे.











