- करसंकलन विभागाने एकाच दिवशी ठोकले ५० सदनिकांना टाळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. एक हजार कोटी रुपयांचे करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करसंकलन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, निवासी सदनिका सील करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी (दि. २३) एकाच दिवशी विभागाने तब्बल ५० निवासी सदनिका सील केल्या आहेत. तसेच ही कारवाई तीव्र करणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे.
शहरातील ५० हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या २६ हजार ७६०, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक १ हजार ३६१ तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या ३ हजार ८५० अशा ३१ हजार ९७१ मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत. तीन लाख निवासी मालमत्ताधारकांकडे तब्बल ५८३ कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आत्तापर्यंत २ लाख ८७ हजार ४४६ मालमत्ताधारकांनी ४६६ कोटी रुपये कराचा भरणा केला आहे.
थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त केल्यानंतर अनेक मालमत्ताधारक त्वरित कर भरत आहेत. मात्र, मालमत्ता जप्तीनंतरही काही जण कर भरत नसल्याचे समोर आले आहे. अशा मालमत्तांच्या लिलावाची कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे. त्याला स्थायी समितीची मान्यता पण घेण्यात आली आहे. मालमत्ता जप्त केल्यानंतर २१ दिवसांच्या आत कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचा इशाराही सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिला आहे.
या सोसायट्यांमधील सदनिका सील…
पिंपरीतील ऍथिया, रावेतमधील पंचवटी, रेनबो प्रोयो, वाकडमधील मॉन्ट व्हर्ट सेविल, पुनावळेतील सियोना, पिपळे सौदागर येथील शुभश्री वुड्स, लाईफ स्टाईल, चिंचवड येथील माइंड्स्प्रेस रिआलिटी क्कीन्स टाऊन, तळवडेतील देवी इंद्रायणी.
वारंवार कर भरण्याचे आवाहन करून मालमत्ताधारक कर भरत नसल्याने महापालिकेला नाइलाजाने कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. बुधवारी एकाच दिवशी शहरातील नामांकित सोसायट्यामधील ५० सदनिका सील करण्यात आल्या आहेत. पुढे थकबाकीदारांच्या सदनिका सील करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. त्यामुळे मालमत्ताधारकांनी थकबाकी आणि चालू वर्षांचा कर भरून सहकार्य करावे
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त…