न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १ मार्च) :- पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या निगडी विभागाची निवडणुक प्रक्रीया बुधवारी सकाळी पार पडली. विभागप्रमुख, उप विभागप्रमुखपदासाठी झालेल्या या निवडणुकीत उद्योजक प्रशांत पाटील आणि विश्वास फापाळे यांनी भरघोस मतांनी विजय मिळविला.
पिंपरी चिंचवड शहरातील पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या सात विभागांची विभागप्रमुखांची निवड प्रक्रीया नुकतीच पार पडली. तर, निगडी विभागाची बुधवारी निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात उतरले होते. यामध्ये, प्रशांत भिमराव पाटील (४५) यांना सर्वाधिक मते मिळाली. तर, विश्वास भिकाजी फापाळे (३७), उमेश बाबुराव साळवी (३५), विरभद्र शंकर शेटे (३४) अशी मतांचा विभागणी झाली. विजेत्यांची नावे जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी जल्लोष साजरा केला.
दि. २७ रोजी निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता. यावेळी, प्रशांत पाटील, विश्वास फापाळे यांना सर्वाधिक मतांनी विजयी करा, असा नारा वृत्तपत्र विक्रेत्यांनी दिला होता. वृत्तपत्र विक्रेत्यांनी मते देवून विश्वास दर्शवित निगडी विभागप्रमुखपदी प्रशांत पाटील तर उपविभागप्रमुखपदी विश्वास फापाळे यांना निवडून दिले. निगडी विभागातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे मत विजयी उमेदवारांनी व्यक्त केले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.











