- खास महिलांसाठी केवळ या मार्गावरून धावणार पीएमपी बसेस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- शहरात गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपी बसमधून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता पीएमपी प्रशासनाने केवळ महिलांकरिता पिंपरी-चिंचवड शहरात ‘महिला स्पेशल बस’ (तेजस्विनी) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ महिलांसाठी या बसेस धावणार असून, यामध्ये महिला कंडक्टरची नेमणूक केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा पीएमपी आहे. पीएमपी बसेसमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात पीएमपीएलच्या सुमारे दीड हजारपेक्षा अधिक बसेस संचलनामध्ये आहेत. दररोज या बसेसमध्ये मोठी गर्दी असते. विशेषतः सकाळी आठ ते बारा आणि रात्री चार ते आठ या ‘पीक ‘अव्हर्समध्ये’ हे गर्दीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे बसमधील महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी महिलांसाठी तेजस्विनी बसेस सोडल्या जातात. मात्र, दुपारी बारा ते सायंकाळी पाच या मधल्या काळात या बसेसमधून पुरुषांना देखील प्रवास दिला जात होता. परंतु आता या बसेसमधून केवळ महिलांना प्रवास करता येणार आहे. तसेच, या सर्व मार्गावरील बसमध्ये महिला कंडक्टरची नेमणूक केली जाणार आहे.
या मार्गाचा समावेश…
मनपा ते आकुर्डी, निगडी ते पुणे स्टेशन, भोसरी, हिंजवडी माण फेज तीन, चिंचवडगाव ते भोसरी, चिखली ते डांगे चौक या मार्गावर बस धावणार आहेत.