- वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर थेट येणार घरपोच दंडाची पावती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीने शहरातील मुख्य चौकात आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. शहरातील पाचशे चौकातील सीसीटीव्ही सुरू केले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता घरपोच दंडाची पावती देण्यात येईल. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना सावधान असणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास होत असताना आणि नागरीकरण वाढत असताना गुन्हेगारी घटनांचे प्रमाणही वाढले आहे. शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने शहरातील प्रमुख चौक, रस्ते यांची निवड करून शहर सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वतीने शहरात आणि पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत साडेचार हजार सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन केले. त्यानुसार निगडी येथे स्मार्ट सिटीने कंट्रोल, कमांड सेंटर तयार केले.
उवरित चौकातील कॅमेरे मार्च २०२३ पर्यंत बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शहर परिसरातील आणखी काही चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील असे सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रण सिग्नलचे होणारे उल्लंघन, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन डिटेक्शन, गतीचे उल्लंघन, चुकीच्या दिशेने वाहनांची होणारी वाहतूक, ड्रायव्हिंग करताना मोबाइल फोनचा वापर यावर नियंत्रण आणण्यात येणार आहे.
शहरात ३२३ ट्रैफिक कॅमेरे (एएनपीआर आणि आरएलव्हीडी) कॅमेरे बसविले. त्याचे नियंत्रण निगडीतील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून केले जाणार आहे. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून शहरातील घडामोडींवर लक्ष असणार आहे. पीटीझेड आणि डोम असे एकूण २०९३ पैकी १३८१ कॅमेरे बसविले आहेत. काही चौकाचे काम सुरु आहे. त्यापैकी अंतर्गत ठिकाणी २७० आणि ११११ असे एकूण १३४० ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.