न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- करोना महामारीमुळे खंडीत झालेली पवनाथडी जत्रा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर भरविण्यात येणार आहे. तब्बल तीन वर्षाच्या कालावधीनंतर दि. १६ ते २० डिसेंबर असे पाच दिवस पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्टॉलसाठी शहरातील महिला बचत गटांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट, महिलांनी वैयक्तीकरित्या तयार केलेल्या वस्तु उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते.
दोन वर्षापूर्वी सांगवीतील ९ मार्च २०२० ला पवनाथडी जत्रा झाली होती. त्यानंतर करोना उद्रेक सुरु झाला. परिणामी, काही वर्षे जत्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. सध्या सर्व निर्बंध शिथिल झाल्याने जत्रेचे आयोजन केले आहे. समाज विकास विभागाच्या या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. जत्रेत महिला बचत गटांसाठी एकूण ४०० ते ४५० स्टॉल असतात. एका स्टॉलमध्ये दोन बचत गटांना जागा दिली जाते. असे एकूण ८०० ते ९०० बचत गटांचा या यात्रेत सहभाग असणार आहे.