- उर्वरित घरांसाठी जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा सोडत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयामार्फत नागरिकांना परवडणाऱ्या घरांसाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रकल्प साकारण्यात आला आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी गुरुवारी (दि. १५) सोडत पार पडली. यामध्ये ४८१ भाग्यवंत नागरिकांना घराची लॉटरी लागली आहे.
पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट प्रवर्गातील ७९३ सदनिका आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील ३१ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन आरके) प्रवर्गातील ३६६ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटातील (वन बीएचके) प्रवर्गातील ४१४ सदनिकांचा असा हा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प आहे. पेठ क्र. १२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन बीएचके) प्रवर्गासाठी एकूण ३१६ लाभार्थ्यांनी, अल्प उत्पन्न गट (टू बीएचके) प्रवर्गासाठी एकूण २६२ लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली होती. तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील आर्थिक दुर्बल घटक (वन आरके) गटासाठी एकूण ३७ लाभार्थ्यांनी, आर्थिक दुर्बल घटक (वन बीएचके) प्रवर्गासाठी एकूण १५७ लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाइन अर्जांची नोंदणी केली होती.
संगणकीय सोडतीची प्रक्रिया महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही सोडत कोमल वंजारे, प्रदीप वेताळ, कोमल कातुरे यांच्या हस्ते काढण्यात आली. पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पासाठी २९१ अर्जदार विजेते ठरले, तर पेठ क्र. ३०-३२ येथील गृहप्रकल्पासाठी १९० विजेते ठरले, तर उर्वरित घरांसाठी जानेवारीत पुन्हा सोडत काढण्यात येणार आहे.
सर्व विजेत्यांची नावे पोर्टलवर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळार प्रसिद्ध करण्यात आली आहे. विजेत्या लाथार्थ्याच्या कागदपत्रांची तपासणी २६ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक सूचनापत्र २० डिसेंबरला ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना १० जानेवारीपूर्वी अंतिम वाटपपत्र देण्यात येईल. त्यानंतर सदनिकेची उर्वरित रक्कम भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. सर्व रक्कम अदा केल्यानंतरच सदनिकांची नोंदणी करून लाभार्थ्यांना ताबा दिला जाणार आहे.
या सोडतीमध्ये ४८१ भाग्यवान विजेत्यांना घर मिळाले आहे. तर उर्वरित घरांसाठी जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा सोडत काढण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचा क्रमांक या सोडतीमध्ये लागला नाही त्यांच्यासाठी पुढची सोडत असेल. लवकरात लवकर नागरिकांना हक्काचे व परवडणारे घर देण्याचे नियोजन आहे.
– बन्सी गवळी, सह आयुक्त. प्रशासन विभाग, पीएमआरडीए…
















