न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नियमबाह्य बांधकाम बांधकामांवर लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली. या निर्णयाचे स्वागत करत शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा केला.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शास्तीकर पूर्ण माफ करण्याबाबत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्य सरकारने शास्ती कर पूर्ण माफ करण्याची घोषणा केली. या निर्णयाचे पिंपरी- चिंचवडकरांकडून स्वागत करण्यात आले.
मोरवाडी येथील भाजपाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर शास्तीकर माफीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आणि सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडमधील सुमारे एक लाख मिळकतधारकांवर लादलेला शास्तीकर आणि अनधिकृत बांधकामवरील कारवाईची टांगती तलवार आता दूर झाली आहे. शिंदे फडणवीस सरकारने शहरातील नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लघु उद्योजकांच्या तसेच औद्योगिक मिळकतीवरील शास्तीचा प्रश्नही आता सुटला आहे. त्यामुळे तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने राज्य सरकारचे आणि शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आभार व्यक्त करते, अशा भावना माझी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केल्या.


















