न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून इमारती, तसेच पालिकेच्या शाळांमध्ये दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. शाळांची सफाई करण्यासाठी सिंग सिक्युरिटी या ठेकेदाराची नेमणूक एप्रिल महिन्यामध्ये केली आहे.
संबंधित ठेकेदाराकडे मनपाच्या १०२ शाळा, १८ माध्यमिक व २ आयटीआय संस्थांची सफाई करण्याचे काम आहे. त्यामध्ये वर्गखोल्या तसेच शौचालयांची दैनंदिन सफाई करण्याचे काम आहे. त्यासाठी ठेकेदाराने ४८५ कर्मचारी नेमले. शाळांतील वर्गखोल्यांच्या संख्येनुसार शाळांमध्ये कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. या कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही.
तसेच दिवाळीचा बोनसही ठेकेदाराने दिला नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून हे कर्मचारी त्यांच्या हक्काच्या वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे खाण्याची पंचायत झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
संबंधित ठेकेदाराबाबत तक्रार आली आहे. त्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी महापालिकेकडून पैसे मिळाले नसल्याचे कारण सांगितले आहे. त्यांना पालिकेने पैसे देणे बाकी आहे. ही बाब खरी असली तरी, त्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे पगार करावे, असा उल्लेख अटी-शर्तीमध्ये. त्यामुळे त्यांना पगार करण्याच्या सूचना केल्या आहेत. – अजय चारठणकर, उपायुक्त, महापालिका…
















