न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- गावाच्या गावठाणापासून २०० मीटरच्या परिघातील आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोनकरिता वाटप केलेल्या क्षेत्रातील कोणतीही जमीन त्यावरील महसूल सरकारजमा करून अशी जमीन अकृषिक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. भोगवटादाराने रक्कम भरल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीत विहीत नमुन्यात सनद देण्यात येईल व त्यानुसार सदरची जमीन अकृषिक झाल्याचे समजण्यात येईल.
गावठाणापासून २०० मीटर क्षेत्रातील अशी जमीन त्या क्षेत्राला लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमांनुसार निवासी प्रयोजनासाठी अकृषिक वापरात रूपांतरित केली जाणार आहे. त्यानंतर ही जमीन रहिवासी प्रयोजनासाठी घोषित करण्यात येईल. जमीन भोगवटादार वर्ग- २ धारणा अधिकाराची असल्यास अशा जमिनीच्या मानीय अकृषिक रूपांतरणापोटी देय नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय देणी भरून ही जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतुदीनुसार अकृषिक वापरात रूपांतरित झाल्याचे समजण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक रक्कम जमा केल्यानंतर जमीन अकृषिक करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी ही प्रक्रिया मोहीम स्तरावर राबविण्यात येणार आहे. नागरिकांना या क्षेत्रात घर बांधणे किंवा इतर प्रयोजनासाठी नियमानुसार जमिनीचा उपयोग करणे शक्य होणार आहे. जमीन अकृषिक करण्यासाठी इतर कागदपत्रांच्या पूर्तता करण्याची देखील आवश्यकता असणार नाही. या योजनेचा लाभ अधिकाधिक जमीनधारकांनी आणि मिळकतधारकांनी घ्यावा आणि तहसीलदारांकडे अर्ज करून जमीन अकृषिक करून घ्यावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.















