न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार, पहिले नगराध्यक्ष, दिवंगत खासदार कै. अण्णासाहेब मगर यांची शंभरावी जयंती येत्या २६ एप्रिल २०१९ रोजी आहे. या शहरासाठीचे त्यांचे योगदान व महत्त्व अनन्यसाधारण आहे. या लोकनेत्याविषयी कृतज्ञता म्हणून महानगरपालिकेने दि. २६ एप्रिल २०१९ ते २६ एप्रिल २०२० पर्यंत “अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी वर्ष” म्हणून घोषित करावे, तसेच त्याअनुषंगिक विविध कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी करणारे निवेदन माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, दिवंगत खासदार, कै. मार्तंड धोंडीबा तथा अण्णासाहेब मगर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते होते. सन १९५२ पासून त्यांनी तत्कालीन हवेली विधानसभेचे अनेक वर्षे नेतृत्व केले. त्याकाळी पिंपरी-चिंचवड परिसर हवेली विधानसभा क्षेत्रात समाविष्ट होता. त्यांच्याच प्रयत्नांनी सन १९७० मध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी या ग्रामपंचायती विलीन करून “पिंपरी चिंचवड नवनगरपालिका” अस्तित्वात आली. त्यावेळी आमदार असलेल्या अण्णासाहेब मगर यांची शासनाने नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
या शहरातील पायाभूत सुधारणा आणि मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. शहरातील नागरिकांसाठी शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक दवाखाने, उद्याने इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्याच, पण त्यांनी १९७४ मध्ये नगरपालिकेची स्वतःची परिवहन व्यवस्था अर्थात पी.सी.एम.टी. सुरू केली. औद्योगिकीकरण आणि व्यापारउद्दीम याला चालना देऊन त्यांनी नगरपालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढविले, त्यामुळेच “श्रीमंत नगरपालिका” अशी शहराची संपूर्ण देशात सर्वदूर ओळख निर्माण झाली. देशात नावारुपाला आलेली आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याच भक्कम पायावर उभी आहे.
सन १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत ते खेड मतदार संघातून खासदार झाले. त्यांनी हयातभर शेतकरी, कामगार व समाजातील सर्व घटकांसाठी भरीव कार्य केले. त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून महापालिकेने जन्मशताब्दी वर्ष घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यानिमित्ताने शहरातील दापोडी ते निगडी या महामार्गाचे “कै.अण्णासाहेब मगर शताब्दी महामार्ग” असे नामकरण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एक नागरिक म्हणून “कै. अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी” निमित्ताने काही सुचना करीत आहे.
१) माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना (सर्व विद्यमान आणि माजी आमदार, महापौर, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी इत्यादी) समाविष्ट करून “कै.अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी स्मृती समिती” स्थापन करण्यात यावी.
२) कै.अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी महानगरपालिकेने विशेष आर्थिक तरतूद करावी.
३) दापोडी ते निगडी या महामार्गाचे “कै.अण्णासाहेब मगर शताब्दी महामार्ग” असे नामकरण करण्यात यावे.
४) महानगरपालिकेची सर्व कार्यालये, शाळा, हॉस्पिटल्स इत्यादी मध्ये “कै.अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी वर्ष” असे त्यांच्या छायाचित्रासह फलक लावावेत.
५) कै.अण्णासाहेब मगर यांच्या समवेत कार्य केलेल्या आणि त्यानंतरही त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विविध क्षेत्रात कार्य करित असलेल्या शहरातील शंभर कार्यकर्त्यांना ” कै.अण्णासाहेब मगर शताब्दी स्मृती चिन्ह” देऊन गौरविण्यात यावे.
६) महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून व महापालिका पातळीवर वक्तृत्व, निबंध, चित्रकला, विज्ञान आणि विविध क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, तसेच विजेत्यांचा गौरव करण्यात यावा.
७) शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून योग्य त्या स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात यावे.
८) महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांचा सन्मान करण्यात यावा.
९) वर्षभरात कधीही “कै.अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी कृतज्ञता सोहळा” आयोजित करून, कै.अण्णासाहेब मगर यांच्या कुटूंबियांचा यथोचित सन्मान करण्यात यावा.
१०) कै.अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापालिकेने राष्ट्रीय पातळीवर कबड्डी स्पर्धांचे आयोजन करावे.
११) कै.अण्णासाहेब मगर यांनी शहरात पहिली सार्वजनिक परिवहन सेवा (पी.सी.एम.टी.) सुरु केली. त्यांच्या सन्मानार्थ व जन्मशताब्दीच्या निमित्ताने शहरातील सर्व महत्त्वाच्या भागांना जोडणारी पी.एम.पी.एम.एल.ची विशेष बससेवा (रिंग-रुट) सुरु करण्यात यावी.
उदा.- पिंपरीगांव, चिंचवडगांव, आकुर्डी, निगडी, तळवडे, चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी, भोसरी, कासारवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, थेरगांव, रहाटणी, पिंपरीगांव. (हे केवळ उदाहरण आहे.)
१२) महानगरपालिकेच्या कोणत्याही चांगल्या उपक्रमास/ प्रकल्पास “कै.अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी” असे नाव देण्यात यावे.
कै. अण्णासाहेब मगर यांचे या शहरावर अनंत उपकार आहेत, याची जाणीव प्रत्येक शहरवासियांना आहे. महानगरपालिकेने पुढाकार घेऊन वरिलप्रमाणे उपक्रम राबविले तर ती खरी कृतज्ञता व्यक्त होईल. कै. अण्णासाहेब मगर यांचा चरित्र अभ्यासक आणि महानगरपालिकेतील माजी सदस्य तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून विनम्रपणे मी या विनंती वजा सुचना केल्या आहेत, असेही बोऱ्हाडे यांनी आयुक्त, महापौर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.











