न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- आकुर्डीगावचे ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेला बुधवारी (दि. २८) रोजी प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती; तसेच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
आकुर्डीचे ग्रामदैवत खंडोबा यात्रा उत्सव सुरू आहे. दोन दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. उत्सवानिमित्त बुधवारी मंदिरात श्री खंडेरायाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. सायंकाळीदेखील महाआरती करण्यात आली. दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती. या वेळी भाविकांनी तळी- भंडारा व जागरण- गोंधळ यासाठी मंदिरात गर्दी केली होती. सायंकाळी पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
आज गुरुवारी यात्रेचा अखेरचा दिवस आहे. त्यानिम्मित कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे; तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त आकुर्डीगावात विविध प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांनी स्टॉल थाटले आहेत. खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.















