- रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा नमुना तयार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. २९ डिसेंबर २०२२) :- केंद्रीय निवडणूक आयोग नववर्षात देशवासियांना मोठे गिफ्ट देणार आहे. ते म्हणजे मतदारांना आता मतदानासाठी आपल्या राज्यात जाण्याची गरज राहणार नाही. परराज्यात राहूनही आपल्या राज्यातील निवडणुकीचे मतदान मतदारांना करता येणार आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय लोकशाही बळकट होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आयोगाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सांगितले की, त्यांनी स्थानिक स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा नमुना विकसित केला आहे. हे नवे तंत्र राजकीय पक्षांना दाखविले जाणार असून त्यासाठी येत्या १६ जानेवारीला राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रिमोट मतदान यंत्रांबाबतही एक चिठ्ठी जारी करण्यात आली आहे. कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी करण्याबाबत राजकीय पक्षांनाही त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीद्वारे निर्मित मल्टी कॉन्स्टिट्यून्सी रिमोट ईव्हीएम एकाच ठिकाणाहून ७२ मतदारसंघ चालवू शकते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, युवकांमध्ये आणि शहरी भागात राहणार्या लोकांमध्ये निवडणुकांबाबत दिसून येत असलेली उदासीनता पाहता, लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी रिमोट मतदान यंत्रे एक प्रभावी उपक्रम ठरतील.
निवडणूक आयोगाने शोधलेल्या या यंत्रामुळे मतदारांना त्यांच्या राज्यातच मतदान करता येईल. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असेल आणि मतदार जर परराज्यात असेल तर त्या मतदाराला महाराष्ट्रात येऊन मतदान करण्याची गरज राहणार नाही. तो मतदार त्या राज्यातच मतदान केंद्रात जाऊन मतदान देऊ शकेल.















