न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्युत विभागात वायरमन, जनरेटर ऑपरेटर, मोटार पंप ऑपरेटर अशा पदांवर काम करणाऱ्या ३० जणांना वीजतंत्री पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी काढला आहे.
महापालिकेच्या विभागातील वीजतंत्री पदाची पदे रिक्त होती. याचाच विचार करून पदोन्नती समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सेवा ज्येष्ठता, संगणक अर्हता आणि शिस्तभंग विषयक कारवाई तपशील पडताळण्यात आला. त्यानुसार सर्व अर्हता आणि पात्र असलेल्या ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार वीजतंत्री पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार क्रम निश्चित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. विद्युत विभाग प्रमुखांनी वीजतंत्री कर्मचाऱ्यांना कामकाजा संदर्भात सविस्तर आदेश काढण्याचा आदेशही अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी दिला आहे.


















