न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- जल उपसा केंद्रातील मोटार जळाल्याने काही दिवसांपासून देहू नगरपंचायतीच्या हद्दीत पाणी पुरवठा बंद होता. पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांच्या खिसा आता पाण्यासाठी मोकळा होतोय, असे चित्र सध्या देहू नगरपंचायत हद्दीत पाहायला मिळत आहे. सोसायट्यांना पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. बुधवारी मोटार दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू झाला.
देहूगाव येथे गेल्या चार दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाला होता. याबाबत माहिती घेतली असता येथील कर्मचाऱ्यांकडून विद्युत पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे सांगण्यात येत होते. याची दुरुस्ती करण्याचे कामही करण्यात आले. यानंतर जल उपसा सुरूही करण्यात आला होता. मात्र, दोन तासानंतर जल उपसा करणारी मोटार जळाली व पुन्हा जल उपसा बंद झाला. यामुळे पुन्हा दोन दिवस पाणीपुरवठा लांबला. दरम्यानच्या काळात गावातून खासगी पाणीपुरवठादारांकडूनही पाणी पुरवठ्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाण्याचे टँकर उपलब्ध नसल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करता आला नाही, असे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी सांगितले. हे जरी खरे असले तरी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना पाणी वेळेत मिळावे, हे ही अपेक्षित आहे.
सध्या देहूत पाणीबाणीची घटना घडल्यानंतर नगरसेवक काय करीत आहेत? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रशासनाकडून पाणी पुरवठा विनाखंडित सुरळीत अनं नियमित व्हावा, अशी माफक अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


















