न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विलास मडीगेरी यांना सर्वाधिक बारा मते मिळाल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याचे पिठासीन प्राधिकारी सुरज मांढरे यांनी जाहिर केले.
आज दुपारी १२ वाजता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी त्यांनी ही निवड जाहिर केली. सभापती पदासाठी विलास मडीगेरी यांचे दोन तर मयुर कलाटे व शितल शिंदे यांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते.
पिठासीन प्राधिकारी यांनी अर्जांची छाननी करून, सर्व उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. त्यांनतर अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या अवधीमध्ये शितल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उर्वरीत दोन उमेदवारांसाठी हातवर करून घेण्यात आलेल्या मतदान निवडणूक प्रक्रियेमध्ये विलास मडीगेरी यांना एकूण १२ सदस्यांची मते मिळाली तर मयुर कलाटे यांना एकूण ४ सदस्यांची मते प्राप्त झाली.
पिठासीन प्राधिकारी सुरज मांढरे, महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीच्या मावळत्या सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकांनी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांचे अभिनंदन केले.
यावेळी खासदार अमर साबळे, स्थायी समितीचे सदस्य शितल शिंदे, नम्रता लोंढे, सागर आंगोळकर, प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर, राजेंद्र गावडे, संतोष लोंढे, झामाबाई बारणे, राजेंद्र लांडगे, आरती चोंधे, करुणा चिंचवडे, राहुल कलाटे, पंकज भालेकर, मयुर कलाटे, भीमा बोबडे, माजी नगरसेविका वर्षा मडिगेरी आदी उपस्थित होते.











