न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड महापालिकेची घसरगुंडी झाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सत्ताधारी भ्रष्ट भाजपा व आपला, आपल्या निष्क्रिय प्रशासनाचा तीव्र निषेध असो, अशा आशयाचे पत्र महापालिका आयुक्त, महापौर यांना पाठविले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्वच्छतेबाबत केवळ तीन वर्षांत शहराची अवस्था इतकी वाईट झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानार्तंगत ४ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत सर्वेक्षण केले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादी दि. ०६ मार्च रोजी जाहिर झाली. त्यामध्ये यंदा घसरण झाली आहे.
४ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडविणे, या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतु होता. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. या कामासाठी मनपाने अठरा लाख रुपये खर्च केला. परंतु, ही जनजागृती कुठे अंमलात येताना दिसली नाही. अठरा लाखाचा चुराडा करुन, केवळ कागदी घोडे नाचवुन हे बोगस काम झाले आहे.
सन २०१६ मध्ये भारत अभियानात आपले शहर ‘टॉप टेन’ मध्ये होते. देशात ९ व्या क्रमांकावरील महापालिका महाराष्ट्रात अव्वलस्थानी होती. भाजपाच्या राजवटीत २०१७ मध्ये पिं. चि शहर पिछाडीवर गेले. ९ व्या क्रमांकावरील आपले शहर थेट ७२ व्या स्थानी फेकले गेले. गतवर्षी त्यामध्ये किंचतशी सुधारणा झाली. देशात महापालिकेचा ४३ वा, तर राज्यात ६ वा क्रमांक आला. मात्र यंदा देशात ५२, तर राज्यात १३ वा क्रमांक आला आहे.
मागील दोन वर्षात महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, ठेकेदार, सल्लागार, संगनमत करुन (रिंग) करुन करदात्या नागरिकाच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे घालून, आपले खिसे भरण्यामध्ये मदमस्त होऊन मुशगुल झाले आहेत. मागील दोन आर्थिक वर्षात स्थायी समितीचा कारभारला अक्षरशः मासळी बाजाराचे स्वरुप आलेले आहे. कचरा निविदेतील संगणमत व टक्केवारीमुळे शहरवासीयांची कचराकोंडी करुन, त्याच्या जिवीताशी खेळण्याचा गंभीर गुन्हा सत्ताधारी पदाधिका-यांनी केला आहे. त्यात आपणही तितकेच सहभागी आहात. या प्रकरणात आपण आपले कायदेशीर कर्तव्य बजावण्यास निष्क्रिय ठरलात. याचा हा ढळढळीत पुरावा आहे. त्यामुळे सत्ताधारी भ्रष्ट भाजपा व आपला, आपल्या निष्क्रिय प्रशासनाचा तिव्र निषेध करित आहोत, असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.











