- अंदाजपत्रकात निधीची तरतूद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जानेवारी २०२२) :- नवीन जिजामाता रुग्णालय आणि थेरगाव रुग्णालयात शस्त्रक्रिया संकुल उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन कोटी १२ लाख रुपये खर्च होईल. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाच्या चौथ्या तसेच थेरगाव रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर शस्त्रक्रिया संकुल बांधणार आहेत. त्यासाठी आवश्यक स्थापत्यविषयक बांधकामे करण्यात आली आहे.
याबाबत दोन्ही रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनीही पत्राद्वारे मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही कामांचा अंदाजपत्रकात नव्याने समावेश करून त्याकरिता तरतूद वर्ग करून निविदेचा निर्णय घेतला.
नवीन जिजामाता रुग्णालयात शस्त्रक्रिया संकुल तयार करणे व इतर आवश्यक कामे करण्यासाठी निविदा मागविल्या. त्यासाठी एक कोटी १८ लाख रूपये खर्च अपेक्षित होता. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून निविदा मागविल्या. त्यानुसार, पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये एकाने ठेकेदाराने निविदा दरापेक्षा २३.९१ टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच ८९ लाख ५७ हजार रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस एक हजार ३६३ रुपये आणि मटेरियल टेस्टींग चार्जेसपोटी १४ हजार ४४५ रुपये असे एकूण ८९ लाख ७२ हजार रुपये खर्च होणार आहेत.
नवीन थेरगाव रुग्णालयात शस्त्रक्रिया संकुलासाठी दोन कोटी ९७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून निविदा मागविल्या. तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. एकाने २५.२५ टक्के कमी दराने निविदा सादर केली. दोन कोटी २२ लाख पाच हजार रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस चार हजार ६७८ रुपये आणि मटेरियल टेस्टींग चार्जेसपोटी २९ हजार १६५ रुपये असे एकूण दोन कोटी २२ लाख ३९ हजार रुपये खर्च होणार आहेत.















