- ‘ सरकारी काम आणि लगेच मिळणार दाम ‘…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांचे संमतिपत्र घेऊन जागेवरच मोबदल्याचा धनादेश देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मावळ आणि मुळशी तालुक्यातील २६ गावांमध्ये पुढील आठवड्यापासून हे शिबीर सुरू होणार आहे.
मावळ आणि मुळशी या दोन तालुक्यांतील २६ गावांत भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याचे मुल्यांकन करताना जागा मालकांना विश्वासात घेऊन आणि त्यांची संमती घेऊन निश्चित करण्यात आले आहे. मुल्यांकन निश्चित करताना ज्या मोकळ्या जमिनी आहेत, त्यांचे आणि ज्या जमिनींवर झाडे, घरे आदी असे मुल्यांकन करून भूसंपादनाचा मोबदला निश्चित केला आहे. त्यास जागा मालकांनी संमती दिली आहे. त्यामुळे संपादित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून स्वतंत्र शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यात दोन गावांत तीन दिवस शिबीर घेतले जाणार आहे. या शिबिरात जागा मालकांचे संमतिपत्र घेऊन त्यांना जागेवर मोबदल्याचे धनादेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ-मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी दिली.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएसआरडीसीने १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. प्रकल्पासाठी ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे.