- महिलांच्या अधिकारांवर आघात करणार्या प्रवृत्ती नष्ट करणे गरजेचे : विभा बोके
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम समाजात महिलांचे अधिकार आणि मूल्ये यांच्यावर आघात करणार्या विघातक प्रवृत्ती हुंडा प्रथा, स्त्रीभ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता आदींचा नाश करणे गरजेचे आहे, असे मत अकेमी बिझनेस स्कूलच्या अध्यक्षा विभा बोके यांनी व्यक्त केले. दरम्यान, महिला दिनानिमित्त मारुंजी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका, विद्यार्थीनींना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच मिठाईचे वाटपही करण्यात आले.
हिंजवडी येथील अकेमी बिझनेस स्कूलच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मारुंजी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थीनींना ‘महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणा’बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात महिलांचे अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अभिषेक बोके, अध्यक्षा विभा बोके, प्रा. मिनू तिवारी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुभद्रा पाडळे आदींसह शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षिका आणि विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना विभा बोके यांनी सांगितले, की आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला या देशाचे भविष्य ठरविणारी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे आवश्यक आहे. महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम समाजात महिलांचे अधिकार आणि मूल्ये यांच्यावर घात करणार्या विघातक प्रवृत्ती हुंडा प्रथा, स्त्रीभ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता आदींचा नाश करणे गरजेचे आहे. तरच परिपूर्ण विकासाचे लक्ष्य पूर्ण होईल. स्त्रियांनीही आपले अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती करून घेतली पाहिजे.
सूत्रसंचालन आणि आभार मुख्याध्यापिका सुभद्रा पाडळे यांनी मानले.











