न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२३) :- त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रेवस्ती, मोरेवस्ती, चिखली, तळवडे, कृष्णानगर हा भाग ५० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. पालिकेने या भागात डांबरीकरण, पाणी, वीज, ड्रेनेज, साफसफाई अश्या मुलभूत सुविधा या भागात पुरवल्या आहेत. परंतु, लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढत होत आहे. अति दाटवस्तीचा हा भाग बनला आहे. पालिकेने डीपी रस्ता व इतर आरक्षणे अद्यापही ताब्यात घेऊन विकसित केलेले नाहीत.
भविष्यात अरुंद रस्त्यामुळे अपघात होऊन अनेकांचे जीव जाऊ शकतात. कागदावरचा डीपी प्रत्यक्षात आमलात आणून त्या ठिकाणी सुसज्ज डांबरीकरण, फूटपाथ व शौचालय बांधावेत. शाळा, उद्यानांसाठी असणारी आरक्षणे ताब्यात घ्यावीत. अतिक्रमण काढून जागा रितसर ताब्यात घ्यावी.
त्रिवेणीनगर ते तळवडे चौक, त्रिवेणीनगर चौक ते सेंट अॅन्स स्कूल ते प्राधिकरण स्कीम, शिवरकर चौक ते साने चौक, शिवरकर चौक ते ताम्हाणे चौक, ताम्हाणे चौक चिंचेचा मळा ते वाघुसाने चौक, साने चौक ते चिखली या डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन रितसर हस्तांतरित करावी व तिथे तत्काळ विकासकामे मार्गी लावावीत, अशी मागणी ठाकरे गटाचे भोसरी विधानसभेचे शिवसेना शहर संघटक रावसाहेब थोरात यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि नगररचनेचे उपसंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.