- कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांचा पालिका आयुक्तांना सवाल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाने शेकडो कोटींचा खर्च करून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक कॅमेरे बसविले आहेत. वाहतुकीला शिस्त, अपघातांचे प्रमाण आटोक्यात राहून नागरिक सुरक्षित राहतील. तसेच दंडापोटी लाखो रुपयांची कमाई होणार आहे. मात्र, हे कॅमेरे बसविण्याचा प्रशासनाचा खरा हेतू काय? याची सोप्या भाषेत प्रशासनाने माहिती जाहीर करावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाहतुकीच्या नियमांसाठी कॅमेरे असतील तर, कोणत्या नियमांसाठी किती रुपये दंड म्हणून घेण्याचे प्रयोजन आहे. तो कशाप्रकारे वसूल करणार? महत्वाच्या व्यक्ती, अधिकारी किंवा अन्य कोणाला यातून वगळले आहे? याचे व्यवस्थापन पालिका प्रशासन, पोलिस की अन्य कुठल्या संस्थेकडे देणार आहात, तेही स्पष्ट करावे. दंड म्हणून जमा होणारी रक्कम कोणत्या संस्थेकडे जमा होणार आहे.
ज्या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत व्हावी, असे वाटते, त्या रस्त्यांवर कुठेही अनधिकृत पार्किंग, फेरीवाले, टपऱ्या, भाजीवाले अथवा अन्यप्रकारचे अडथळे येणार नाहीत, याची खात्री प्रशासनाने केली आहे? शहरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या मॉलसमोर आणि दुकानासमोर उभी राहणारी ग्राहकांची वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याबाबतीत प्रशासनाने काय उपाय योजले आहेत? मागिल वर्षी प्रशासनाने काही मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत दुकाने, पत्राशेड आदींवर धडक कारवाई केली होती. मात्र, त्याचा राडारोडा, कचरा अद्याप तिथेच पडून आहे. त्या रस्त्यांचे सपाटीकरण व विस्तारीकरण करण्यासाठी प्रशासनाकडे आर्थिक निधी, नियोजन, धाडसीपणा की मनुष्यबळाची कमतरता आहे? याचा खुलासा आयुक्तांनी करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.