न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- मनोहर धोंडदेव जांभेकर ऊर्फ एम.डी.जांभेकर या नावाला पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरात एक विशेष ओळख आहे. जांभेकरसरांचा जन्म कोकणात डोर्ले या गावी १३ नोव्हेंबर १९३१ रोजी झाला. सर म्हणजे अत्यंत महत्वाकांक्षी, प्रचंड मेहनत करायची तयारी, अत्यंत बुद्धिमान, गणित, इतिहास या विषयांची आवड आणि त्यांचा चांगला अभ्यास असलेले उमदे व्यक्तिमत्व. त्यांनी विल्सन कॉलेज मध्ये बी.एससी. (ऑनर्स) हि पदवी प्राप्त करून, नंतर कायद्याची एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. चरितार्थासाठी पुण्यातील नामांकित इनव्हेस्टा मशिन टूल्स कंपनी मध्ये ट्रेनिंग ऑफिसर म्हणून नोकरी केली. त्यावेळी पिंपरी चिंचवड परिसरात अनेक कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता होती.
इथल्या बेरोजगार तरुणांना कौशल्य शिक्षणाची किती गरज हे सरानी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकार्यांना पटवून दिले. आणि स्वतः कामगारांसाठी वर्ग सुरु केले. तेव्हा त्यांच्या मनात आले कि आपण स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन करावी जी गरजू, होतकरी मुलांना नोकरी मिळवून देऊ शकेल. आपल्या कोकणातील समविचारी मित्रांना घेऊन १९६४ साली सरांनी भाड्याच्या छोट्याश्या जागेत ‘औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था “एटीएसएस स्थापन केली. त्यांची सुविद्य पत्नी नलिनी जांभेकर ह्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक उतार- चढावामध्ये त्यांची साथ दिली.
पिंपरी चिंचवड च्या शालेय शैक्षणिक विकासामध्ये आज सिटी प्राईड शाळा अग्रमानांकित मानली जाते. गेल्या अनेक तपांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेनेही त्यांच्या शैक्षणिक कार्याचा उचित गौरव केलेला आहे. शिक्षण गौरव पुरस्कार, कोंकण भूषण, रोटरी व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार, पीसीएमसी आयकॉन यांसारखे अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. त्यांच्या विविध महाविद्यालये तसेच शाळांनासुद्धा अनेक देश विदेशातील संस्थानी गुणवत्तेसाठी प्रमाणीत केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी नलिनी दोन मुली डॉक्टर अश्विनी कुलकर्णी, डॉक्टर दिपाली सवाई जावई डॉक्टर अभय कुलकर्णी सुनील सवाई तसेच चार नातवंड व एक नात सून असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी चिंचवड येथे करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.