- बॅलेट युनिट, कण्ट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रांत तांत्रिक बिघाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी पुण्यात एकूण १७२० मतदान यंत्रे देण्यात आली आहेत. त्यामध्ये बॅलेट युनिट, कण्ट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट या यंत्रांचा समावेश आहे. मतदान प्रात्यक्षिकानंतर यांपैकी १६६४ बॅलेट युनिट, १६१७ कण्ट्रोल युनिट आणि १६२० व्हीव्हीपॅट यंत्रे सुस्थितीत आहेत. तर, ५४ बॅलेट युनिट, ९७ कण्ट्रोल युनिट आणि ९४ व्हीव्हीपॅट यंत्रांत तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. बिघाड असलेली यंत्रे पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवून देण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यंत्रांचे प्रत्यक्ष मतदान घेऊन यशस्वी प्रात्यक्षिक (मॉक पोल) जिल्हा निवडणूक शाखेकडून घेण्यात आले.
त्याकरिता नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले होते. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले.












