- राँग साईड, नो इंट्री तसेच बिआरटीच्या मार्गिकेमधुन जाणारी वाहनं केली ‘टार्गेट’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :-पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरीकांची संख्याही मोठी असुन त्यांच्यामार्फत दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरीकांकडुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असून या उल्लंघनामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होवुन गंभीर व किरकोळ स्वरुपाचे अपघात होत आहेत. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत तसेच वित्तहानी होत असल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरीता पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार (दि. २०/०१/२०२३ ते ३१/१/२०२३) दरम्यान बारा दिवसांच्या विशेष मोहिमेंतर्गत राँग साईड, नो इंट्री तसेच बिआरटीच्या मार्गिकेमधुन जाणाऱ्या वाहनांविरुद्ध मोठी कारवाई केली.
सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे तसेच पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी चिंचवड वाहतुक विभागाने या मोहिमेदरम्यान राँग साईडच्या एकुण १०९२ वाहनांवर खटले दाखल केले. तसेच नो इंट्रीच्या (प्रवेश बंद) एकुण ३१३८ केसेस करुन २,२५,५,२५० रुपये दंड, तसेच बीआरटी मार्गिकेमधून जाणाऱ्या वाहनांवर एकुण २४५० केसेस करुन १४,०६,२०० रुपये दंड आकारण्यात आला असून अशाप्रकारे एकुण १०९२ वाहनचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असुन नो इंट्रीच्या / बीआरटी मार्गिकेमधुन प्रवास करणाऱ्या वाहनांवर एकुण ५५८८ केसेस करुन एकुण ३,६६,१,४५० एवढा दंड आकारण्यात आला आहे.
यापुढे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या हेडखाली वाहतुक विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याने नागरीकांनी वाहतुक नियमांचे पालन करुन पिंपरी चिंचवड पोलीसांना सहकार्य करावे असे अवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.












