न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- दहा हजार व पंचवीस हजार रुपयांवरील मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ‘मार्च एन्ड’ जवळ आल्याने जप्तीची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. हाउसिंग सोसायट्या वगळता अन्य ज्या निवासी मालमत्तांकडे एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे त्यांचे नळजोड तोडण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सोमवारी सांगितले.
आतापर्यंत ६०० कोटी रुपयांचा मिळकतकर पालिका तिजोरीत जमा झाला आहे. शहरातील थकबाकीदारांना नोटीस बजावून जप्तीची मोहीम तीव्र केली आहे. थकबाकीदारांचा सदनिका, व्यावसायिक गाळे जप्त केले जात आहेत. आकडेवारीनुसार २८ जानेवारीपर्यंत थकबाकी न भरल्यामुळे ५२६ मालमत्ता सील केल्या आहेत. आतापर्यंत ८ हजार ८३६ जप्ती अधिपत्र तयार केली आहेत. तीन हजार २२५ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. कारवाईनंतर २ हजार ८१२ मालमत्तांचा कर वसूल झाला आहे. कारवाईत तब्बल ४३ कोटी ६८ लाख २१ हजार २३२ वसुली झाली आहे.
वारंवार कर भरण्याचे आवाहन करूनही काही नागरिक थकीत मिळकतकर भरत नाहीत, त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत जप्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. हाउसिंग सोसायटी वगळता अन्य ज्या निवासी मालमत्तांकडे एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यांचे नळजोड तोडण्यात येत आहेत. तसेच, जप्तीची कारवाई केली जात आहे. कारवाईच्या वेळी स्पीकरवर आवाहनही केले जात आहे, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
आतापर्यंत ६०० कोटींची वसुली “मिळकत करातून झाली आहे. अद्यापही मोठे लक्ष गाठणे बाकी आहे. आर्थिक वर्षातील फेब्रुवारी व मार्च या महिन्यात उर्वरीत कर वसुलीचे नियोजन महापालिकेने केले आहे. अद्याप मिळकतकर भरलेला नाही. त्यांनी कर भरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.












