न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च) :- पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून सर्व जाती धर्म वधू-वर सूचक केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन एन.जी.ओ. फेडरेशनच्या अध्यक्षा प्रिती काळे आणि वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशनल आणि यु.एल.ए. पार्लमेंट असोसिएशनच्या सदस्या कांचन वीर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, नगरसेवक गोपाळ माळेकर, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नितीन चिलवंत, सुनिल काकडे, प्रा. संपत गर्जे, नामदेव पवार, माधव मनोरे, विजय सोनवणे, राहुल इंगळे, बाळासाहेब काकडे ,अण्णा जोगदंड, जीवन बोराडे, सखाराम वालकोळी, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, मराठवाडा जनविकास संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अरूण पवार यांनी सांगितले, की नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात गावाकडून खूप लोक आले व येथेच स्थायिक झाले. आताच्या या धकाकीच्या जीवनामध्ये लोकांना गावाकडे काही प्रसंगानिमित्तानेच जाणे होते. गावाकडील नातेवाईक मंडळींशी संपर्क कमी झाला आहे. त्यामुळे मुला मुलींचे विवाह जमवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हिच गोष्ट लक्षात घेऊन मराठवाडा जनविकास संघाने सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी या वधूवर सूचक केंद्राची स्थापना केली आहे. भविष्यात या वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून मराठवाडा जनविकास संघ सामुदायिक विवाहांचे सुद्धा आयोजन करणार आहे. जेणेकरून विवाहसमारंभावर होणारा अवाढव्य खर्च टाळला जावू शकेल, असे अरुण पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराम माळी यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत कुरूळकर व आभार वामन भरगंडे यांनी मानले.