- वाकड, सांगवी, हिंजवडी, आळंदी, म्हाळुंगे एमआयडीसीतील गुन्हेगारांवर वचक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत पोलिसांनी मोठी आणि बेधडक कारवाई केली. शहरातील वाकड, सांगवी, हिंजवडी, आळंदी, म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात लोखंडी पिस्टल, मॅग्झीनसह जिवंत काडतूसं, लोखंडी कोयता, तलवारी आणि इतर ऐवज जप्त करीत तब्बल १३ जणांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे. आरोपींवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान बेकायदेशिर आणि विनापरवाना २३,००० रुपये किंमतीचे पिस्तुल आणि ५०० रुपये किंमतीचे जिवंत राउंड असा एकूण २३,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जवळ बाळगल्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केले आहे. ही कारवाई (दि. २) रोजी रात्री ७.५० वा. पंचरत्न हॉटेलजवळ, डोंगरवस्ती, निघोजे येथे पोलिसांनी केली. अजिंक्य कैलास जाधव (वय २३ वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ०३ /२०२३ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) /१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रहाटणीतील कोकणे चौक येथील हैद्राबाद बिर्याणी हाऊस समोरील, आकाशगंगा येथे पाच लाखांच्या स्विफ्ट कारमध्ये (एम.एच.१४ जी. वाय.८९५४) २ लोखंडी पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे, १ तलवार व २ कोयते असा एकूण १,०१,९०० रूपये किंमतीचा ऐवज बाळगला असल्याची माहिती वाकड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी (दि. १) रोजी दुपारी ३:१० वा. सुमारास आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ऐवज जप्त केला. आदर्श ऊर्फ आद-या दत्ता गुंड (वय २२ रा. रहाटणी नखाते वस्ती, राजगड कॉलनी), सुमित गाडे (वय २१ वर्षे, रा. शिवारचौक, दुर्गामाता कॉलनी, पिंपळे सौदागर), गणेश सुनिल गुटाळ (वय २४ वर्षे, रा. समता कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी), अशोक आनंदराम पटेल (वय २२ वर्षे, रा. राहुल कांबळे यांच्या घरात भाडयाने, कुरळीफाटा, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलिसांनी आरोपींवर १०५/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ महा पो अॅ कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वाकड पोलीस स्टेशन हद्दीतीत नंददीप कॉलनी नं. ४ बोर्डजवळ, दुर्गामाता व काळुबाई मंदीरसमोर, पाचपीर चौक-विठ्ठल मंदीर रोड, नढेनगर काळेवाडी येथे आरोपींनी १,११,००० रुपये किंमतीचा ऐवज जवळ बाळगला. ज्यामध्ये ३०० रु. कि.चा एक लोखंडी कोयता, ५०,००० रुपये किंमतीचे देशी बनावाटीचे पिस्टल मॅगझीनसह, ७०० रु. कि.चे. एक जिवंत काडतुस (राऊंड) व एक मोकळी काडतुसची पुंगळी, १०,००० रुपये किंमतीचा मोबाईल, ५०,००० रु. कि.ची हिरो स्पॅल्डर मोटार सायकल (एमएच १२ आरई ३८६५) यांचा समावेश आहे. आरोपींनी पिस्टल व जिवंत काडतुस सह आरोपी ४ याच्याकडुन आणले आहे.
वाकड पोलिसांनी (दि. १) रोजी ६.३० वाजता कारवाई करीत आरोपींना अटक केली. निलेश भगवान तारु (वय ३२ वर्षे रा. नंददीप कॉलनी नं.४ नढेनगर काळेवाडी), अक्षय प्रकाश मानकर (वय २२ वर्षे रा. विठ्ठल रुक्माई मंदीर शेजारी, सांगुण उत्तमनगर), वैभव सुरेश मानकर (वय ३० वर्षे रा. पारुदत्त कॉम्पलेक्स दांगटनगर शिवणे), हितेश सुरेश मानकर (रा. पारुदत्त कॉम्पलेक्स दांगटनगर शिवणे) यांच्यावर १०६/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम ३७ (१) (३), १३५ अन्वये वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघेजण अटकेत आहेत.
मारुंजीतील कोलते पाटील गेटपासुन पुढे, इंडीयन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, नेरे कासारसाई रोड येथे आरोपीने विनापरवाना स्वतःच्या ताब्यात २०,००० रुपये किंमतीची एक गावठी कट्टा (पिस्टल), २०० रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसं असा एकूण २०,२०० रुपयांचा मुद्देमाल जवळ बाळगला. हिंजवडी पोलिसांनी (दि. २) रोजी सायंकाळी ५.४० वा. सुमारास कारवाई करित आरोपीला ताब्यात घेतले. साईकिरण मोहन गोरे (वय १९ वर्षे, रा. संतोष ढवळे यांची खोली मारुंजी रोड लक्ष्मी चौक, हिंजवडी, मुळगाव मु.पो. दगड सांगवी ता. लोहा जि.नांदेड) असे अटक आरोपीचे नाव आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात ९३/२०२३ भा.इ.का. कलम ३ (२५), महा.पो.अधि कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सांगवीतील कृष्णा चौक, कदम चाळ, शेजारील मोकळया मैदानात आरोपीने स्वतःजवळ १०,००० रुपयांचा गावठी कट्टा, १००० रुपयांचा जिवंत काडतुसे (राऊंड) असा एकूण ११००० रुपयांचा ऐवज अवैधरित्या बाळगला. सांगवी पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने (दि. २) रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. अंकित ऊर्फ अनिकेत अशोक कदम (वय २२ वर्षे सुष्टी चौक, वैदूवस्ती चौक, कदम चाळ, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीवर ५३/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
आळंदीतील केळगाव चौक येथे लोखंडी पिस्टल मॅग्झीनसह दोन जिवंत काडतूस व एक लोखंडी कोयता सोबत बाळगणाऱ्या तिघांना आळंदी पोलिसांनी (दि. १) रोजी दुपारी ३.३० वाजता कारवाई करीत ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर बाळासाहेब पारवे (वय २२ वर्षे, रा. वाटर हाउस, गोपाळपुरा, केळगाव, ता खेड, पुणे), सिध्देश सिताराम गोवेकर (वय २८ वर्षे, वडमुखवाडी, च-होली), यश शिवाजी भोसले (वय २२ वर्षे, दत्तमंदीरा जवळ, आळंदी देवाची) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















