- महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तंबी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- तळवडे या रेडझोन भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश फ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांना देण्यात आले आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
यासंदर्भात पालिका व फ क्षेत्रीय कार्यालयांकडे वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात विचारले असता ते बोलत होते.
रेडझोन भागात कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र, तळवडे भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. रेडझानमधील सदनिका व गाळ्यांच्या खरेदी-विक्री दस्त नोंदणी मुद्रांक व नोंदणी विभागाकडे सर्रासपणे केली जात आहे. चार ते पाच मजली अनधिकृत इमारती बांधून सदनिका व गाळ्याची विक्री केली जात आहे. त्या भागात दुकाने, मॉल, रुग्णालय, हॉटेल, वर्कशॉप सुरू आहेत. बेशिस्तपणे अनधिकृत इमारती उभ्या राहत असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका व अग्रिशमन बंब जाण्यास रस्ता अपुरा पडत आहे.
अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले, की अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र पथके तैनात करण्यात आले आहे. त्याचे सर्व अधिकारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे आहेत. तळवडे या रेडझोन भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश फ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांना देण्यात आले आहेत.












