न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यापुढील समस्या काही केल्या जात नाहीत. पार्थ पवार यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय संधान साधून, मावळ मतदारसंघात जोर बैठकांना सुरुवात केली आहे. मावळ तसेच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी कामास लावले आहे. परंतु, राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचा मात्र, पार्थ पवार यांच्या नावास अजूनही हिरवा कंदील असल्याचे दिसत नाही.
आज बुधवार (दि. १३ मार्च) रोजी वाकड परिसरातील एका ठिकाणी शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघ व जिल्ह्यातील पक्षाचे बूथ, कमिटीप्रमुख, तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी एका कार्यकर्त्याने शरद पवार यांना ”आपण पार्थ पवार यांना नेते म्हणून दिले आहे, त्यांना १०० टक्के निवडून आणू”, असे सांगितले.
तेव्हा शरद पवार यांनी ”अजून मावळ लोकसभा मतदार संघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. येत्या दोन-तीन दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करतील”, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अजूनही मावळसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे दिसत नाही. येत्या दोन तीन दिवसात उमेदवार जाहीर होणार असल्यामुळे, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व पार्थ पवार समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे.











