न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी धन्वंतरी योजनेबाबत अत्यंत महत्वाचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या सर्व सभासद बंधू-भगिनींना सुचित करण्यात येते की, महानगरपालिकेच्या धन्वंतरी स्वास्थ्य योजनेबाबत महानगरपालिका ही योजना बंद करुन, विमा योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे.
परंतु, अद्यापपर्यंत कोणतीही अशी विमा योजना लागू करणेत आलेली नाही. तथापि काही जणांकडून कर्मचारी महासंघाच्या नावाखाली धन्वंतरी योजनेबाबत व विमा योजनेबाबत गैरसमज निर्माण करुन, व अफवा पसरवुन सभासदांकडून सह्या गोळा केल्या जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच सदरच्या सह्या ह्या महासंघाचे हितशत्रू चुकीच्या विषयांबाबत माहिती देवुन घेत आहेत.
तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या सर्व सभासदांनी महासंघाशी प्रत्यक्ष संपर्क साधून, सत्यता पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही कागदावर सह्या करु नयेत. कारण कर्मचारी महासंघाने या संदर्भात कोणतीही सह्यांची मोहिम राबविलेली नाही. मेडिकल विमा लागु करण्यापुर्वी कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी प्रत्येक सभासदाच्या कामकाजाच्या ठिकाणी येऊन मिटींग घेऊन आपल्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत. याद्वारे धन्वंतरी स्वास्थ्य योजनेतील पुर्वीच्या अटी कायम ठेवुन कर्मचा-यांसाठी जास्तीत जास्त उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे धोरण निश्चित केले जाईल.
त्याविषयी प्रशासनाशी चर्चा करुन, मान्यता मिळाल्यावरच संघटनेकडून त्यास मंजुरी दिली जाईल. तोपर्यंत सध्या धन्वंतरी स्वास्थ्य योजना जशी आहे तशीच चालु असणार आहे. परंतु, कर्मचारी महासंघाच्या काही हितशत्रूकडून पसरविण्यात येणा-या कोणत्याही अफवांना बळी पडु नये. तसे काही घडत असल्यास थेट कर्मचारी महासंघाशी संपर्क साधावा, असे झिंजुर्डे यांनी या परिपत्रकात म्हटले आहे.











