न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- इयत्ता दहावी व बारावी परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. भरारी पथके नियुक्त केली जाणार असून, परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्सही बंद राहणार आहे. कॉपी करताना अथवा त्यासाठी मदत करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
शहरासोबतच जिल्ह्यात मंगळवार (दि. २१) बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलिसांनी सर्वच परीक्षा केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाइलला बंदी घालण्यात आली असून, केंद्र परिसरातील दुकाने, शॉप बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता बारावीची व २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षा २१ पासून, दहावीची २ मार्चपासून बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २१ मार्च आणि दहावीची परीक्षा दि. २ ते २५ मार्चदरम्यान होणार आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा हेच परीक्षा केंद्र होते. मात्र, यावर्षी परीक्षा केंद्र बाहेर असणार आहे.
कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकांचे लक्ष राहणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिका री, प्राचार्य (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था), विशेष महिला भरारी पथक, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची पथके असतील. तसेच प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नेमले जाणार आहे. कॉपीचे प्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकारांची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन नंबर दिला जाणार आहेत. त्यावरील तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. परीक्षेत कॉपी करणारे व पुरविणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
शासन यावर्षी मोठ्या प्रमाणावर कॉपीमुक्त अभियान राबवत आहे. विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉपीमुक्त अभियान सर्वांनी मिळून यशस्वी करावे.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी…












