- आधार कार्ड काढणे होणार त्रासदायक?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२३) :- आजवर कधीही आधार कार्ड न काढलेल्या १८ वर्षापुढील व्यक्तींची नोंदणीनंतर १८० दिवसांत तपासणी होणार आहे. तहसीलदारांमार्फत होणाऱ्या या तपासणीत संशयास्पद काही आढळल्यास संबंधित व्यक्तीला आधार देता येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तपासणीत काहीही आक्षेपार्ह न आढळल्यास त्यांना आधार कार्ड देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या यूआयएआयडी विभागाने सर्व राज्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
आधार कार्ड देण्याची योजना बारा वर्षांपूर्वी सुरू झाली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी आधार कार्डचे लिंकिंग बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता दहा वर्षांपूर्वी काढलेल्या, मात्र फोटो, पत्ता व अन्य माहितीत कोणतेही बदल न केलेल्या आधार कार्डात दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही मोहिमांमध्ये नवीन आधार कार्ड देण्याची मोहीमदेखील सुरूच आहे. मात्र, आजवर एकदाही आधार कार्ड न काढलेल्या व्यक्तींची प्रत्यक्ष, तसेच कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी केंद्राने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत.
पूर्वी आधारसाठी नोंदणी केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर लागलीच आधार देण्यात येत होते, आता १८ पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे. त्यानुसार अशा व्यक्तीनी आधार कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर त्यांची १८० दिवसांमध्ये तपासणी केली जाणार आहे. यासाठी तहसीलदारांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले आहे. तहसीलदारांनी त्यांच्या टीममार्फत संबंधित व्यक्तीची तपासणी करणे अनिवार्य केले आहे, अशा व्यक्तींची तपासणी करताना संबंधित गावात किंवा आजूबाजूला, तसेच त्यांची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारात आधार कार्ड देण्यासाठी १८० दिवसांचा कालावधी ठरविला आहे. १८० दिवसांत संबंधिताची तपासणी न झाल्यास तहसीलदारांकडून आणखी मुदतवाढ मागितली जाऊ शकते. मात्र, ही तपासणी कोणत्याही परिस्थितीत १८० दिवसांतच करावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. तपासणीत काही संशयास्पद आढळल्यास आणि तसा अहवाल तहसीलदारांनी दिल्यास अशा व्यक्तींना आधार कार्ड देण्यापासून रोखण्यात येणार आहे. मात्र, या तपासणीत कोणतेही आक्षेपार्ह न आढळल्यास त्यांना आधार कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा असेल. शून्य ते अठरा वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी यात कोणताही बदल केलेला नाही.
तपासणीतून होणार स्पष्ट..
एवढी वर्षे आधार कार्ड का काढले नाही, अशा संशयावरून अशा व्यक्तीची तपासणी करावी, असा सूर केंद्र सरकारमध्ये उमटला होता. त्यानुसारच नवीन आधारसाठी ही अट लावली आहे. यातून अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. निर्वासित, स्थलांतरितांची तपासणी झाल्यास त्यातून अनेक गोष्टी समोर येणार आहेत.
अपडेट करणेही बंधनकारक..
सध्या दहा वर्षांपूर्वी काढलेल्या आधार कार्डच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. हे बंधनकारक नसले तरी लवकरच ते बंधनकारक होणार आहे. अनेक योजनांसाठी आधार कार्ड जोडणी सक्तीची केल्याने अपडेट असलेलेच आधार कार्ड यापुढे जोडले जाणार आहे.















