न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च) : राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना मावळ लोकसभेची उमेदवारी आज जाहीर केली आहे. पक्षाकडून करण्यात आलेल्या या घोषणेचे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे. पिंपरीतील पार्टी कार्यालयात शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत पार्थ पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाची इच्छा, आकांक्षा असते. मी स्वत: मावळमधून इच्छूक होतो. परंतू पक्षाने पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी सुरूवातीलाच सांगितले होते की, पक्ष जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. पार्थ यांच्या उमेदवारीचे आम्ही स्वागतच करतोय. आता मोठ्या ताकदीने काम करणार आहोत. मावळमध्ये राष्ट्रवादीचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ नेते हनुमंत गावडे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेविका शमीम पठाण, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, निलेश पांढरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.











