न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- १४ मार्च आज मध्यरात्रीपासून शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप पुकारला आहे.मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जर यासंदर्भात संपकरी कर्मचाऱ्यांसाठी समाधानकारक असा तोडगा निघू शकला नाही, तर हे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील. यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांकडून सेवा पुरवल्या जाणाऱ्या सर्वच विभागात परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्यरात्री १२ वाजल्यापासून जवळपास १६ लाख १० हजार कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे.
हा सगळा वाद राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाच्या भोवती सध्या फिरत आहे. २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना आधीच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं. ही निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्यात यावी, रुजू वर्षाची मुदत रद्द करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत संपकरी कर्मचाऱ्यांसमवेत संपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये दोन्ही बाजूंना समाधानकारक असा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यावर असहमती झाल्यामुळे ही बैठक निष्फळ झाली.


















