न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च) :- पिंपरी चिंचवड व भोसरी एमआयडीसी परिसराकडे सत्ताधारी व नेतेमंडळींनी तसेच आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे ”आव जाव घर तुम्हारा” अशी बेवारस एमआयडीसीची अवस्था आहे. एमआयडीसी परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, ”गेली ४५ वर्ष पिंपरी चिंचवड व भोसरी शहर परिसर हे औद्योगिक क्षेत्र आहे. परंतु, या परिसरात मूलभूत सुविधांची वानवा आहे. परिसरात बेकायदेशीर लहान-मोठे पत्र्याचे शेड उभारून बाहेरील लोक अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे शहराचा दर्जा व औद्योगिक परिसरात गुन्हेगारी वाढून, येथील उद्योजक स्थलांतर करीत आहेत. लहान दुकाने, खोकी, टपऱ्या, हातगाड्या यामुळे गुदमरलेले रस्ते, टायरची दुकाने व त्यामुळे उद्योजक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हा परिसर सुमारे तीन हजार एकरवर पसरलेला असून, परिसरात २२ ब्लॉक आहेत व कमीत कमी पाच ते सहा हजार इंडस्ट्रीज आहेत. एमआयडीसी परिसरात ड्रेनेज सुविधा. महिलांसाठी शौचालय, अंतर्गत बस वाहतूक, कचरा प्रश्न तसेच परिसरातील उद्याने ओस पडली आहेत. फोरमच्या प्रयत्नातून मध्यंतरीच्या काळात जुन्या पाईपलाईन बदलण्यात येत आहेत व काही ठिकाणी कचरा गाड्या सुरू केल्या आहेत, त्याबद्दल धन्यवाद. मुळात फक्त नावाला एमआयडीसी दर्जा आहे. महानगरपालिकेने पूर्णपणे या परिसराकडे दुर्लक्ष केले आहे.
त्यामुळे येथील बरेच उद्योग स्थलांतरित झाले असून, शहरातील पुरवठादार व कामगार मोठ्या प्रमाणात बेकार झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास एकेकाळी आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून नावाजलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात जास्त गलिच्छ एमआयडीसी म्हणून नावाजली जाईल. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक एमआयडीसी परिसराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ”आव जाव घर तुम्हारा” अशी बेवारस एमआयडीसीची अवस्था आहे. लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास उद्योजक रस्त्यावर उतरल्याशिवय राहणार नाही, असे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी या पत्रात म्हटले आहे.











