- या मुदतीत करता येणार शाळेतच अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- जिल्हा जात पडताळणी समितीकडून महिनाभर समता पर्व राबविण्यात येत असून याअंतर्गत विविध योजना राबविण्यात येणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रासाठी शाळेतच अर्ज भरता येणार आहेत. जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचे नियोजनही करण्यात येणार आहे. समाज कल्याण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत १ ते ३० एप्रिल यादरम्यान सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येणार आहे. यामध्ये जातवैधता प्रमाणपत्रासंबंधी कार्यवाही जलदगतीने होण्याकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येणार असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, पुरावे साक्षांकित प्रत जोडून अर्ज तत्काळ कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या आश्रम शाळा, वसतिगृह तसेच शासकीय निवासी शाळा यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र वितरित करणे व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या वतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधला जाणार आहे.
शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.












