न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- पुण्यातील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) च्या पुढाकाराने व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानातील नवकल्पना या विषयावरील तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली. या दोन दिवसीय ऑनलाईन परिषदेसाठी एमएएचएसए विद्यापीठ, मलेशिया, इंडो युरोपियन एज्युकेशन फाउंडेशन, पोलंड व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) आणि ईगलबर्गमन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान या विषयातील नवकल्पनांवर संशोधक, शिक्षणतज्ञ्, तंत्रज्ञ, उद्योजक व विद्यार्थी यांच्यात परस्पर अभ्यासपूर्ण संवाद व्हावा या हेतूने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
परिषदेच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे व मलेशियाच्या एमएएचएसए विद्यापीठाचे प्रा. डॉ. सीरियाक नेलीकूनेल देवासिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत मान्यवर व्याख्यात्यांचे सांगत केले. डॉ. मुंढे यांनी परिषदेच्या मध्यवर्ती संकल्पनेचे महत्व व माहिती विषद केली.
यशस्वी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात परिषदेच्या संयोजन समितीला शुभेच्छा देत ‘नवकल्पना’ या विषयावर मार्गदर्शन केले. मलेशियाच्या एमएएचएसए विद्यापीठाचे प्रा. डॉ. सीरियाक नेलीकूनेल देवासिया यांनी त्यांच्या मनोगतात चॅट जीपीटी, आर्टिफिशल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे विचार करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे बदलत आहे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ईगलबर्गमन इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गुरबक्ष सिंग यांनी परिषदेच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित सादरीकरण करत विविध उदाहरणांद्वारे आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर यांनी त्यांच्या व्याख्यानात सध्याच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी नवकल्पनांचा स्वीकार अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ मिडल ईस्टचे डॉ. मुजताबा मोमीन यांनी त्यांच्या व्याख्यानात मनुष्यबळ व्यवस्थापनात तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी नवकल्पनांच्या वापरावर भर द्यायला हवे असे मत मांडले.
त्यानंतर भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस.व्ही. भावे यांनी त्यांच्या व्याख्यानात नवकल्पनांमुळे झालेल्या प्रगतीची काही उदाहरणे सांगत सविस्तर मार्गदर्शन केले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. कॅप्टन.डॉ. सी. एम. चितळे यांनी त्यांच्या व्याख्यानात भारतीय पौराणिक कथांचे दाखले देत नवकल्पनांवर मार्गदर्शन केले.
परिषदेच्या पहिल्या दिवशी ६० शोधनिबंध सादर करण्यात आले. ज्यासाठी प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्चचे संचालक डॉ. सुनील धनवडे,सिम्बॉययसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. चंद्राणी सिंग व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्सच्या एमसी ए विभाग प्रमुख डॉ. अश्विनी ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर सदर शोधनिबंध सादर करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ईगलबर्गमन इंडिया प्रा. लि. च्या मनुष्यबळ व प्रशासन विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापिका पल्लवी भोईटे यांनी त्यांच्या मनोगतात त्यांच्या कंपनीमध्ये कशाप्रकारे नवकल्पनांचा स्वीकार केला गेला याबद्दलही सविस्तर माहिती दिली. तर इंडो युरोपियन एज्युकेशन फाउंडेशन, पोलंड चे अध्यक्ष डॉ. प्रदीप कुमार यांनी त्यांच्या मनोगतात भारत आणि युरोपियन देशांमधील शिक्षण पद्धती व विद्यापीठांमध्ये नवकल्पनांचा कसा परिणाम होत आहे याबद्दल सविस्तर विवेचन केले.
पोलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, न्यासा चे प्रा. डॉ. इन्झ.मारिसुझ कोलोसोव्स्की व ओमानच्या बुरैमी विद्यापीठाचे डॉ. शाद खान यांनी त्यांच्या व्याख्यानात सध्या भेडसावत असलेली आव्हाने लक्षात घेता सांप्रत जगातील शैक्षणिक पद्धती व धोरणांचा पुर्नविचार होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
समारोप सत्रात ईगलबर्गमन इंडिया प्रा. लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष इंदर सिंग यांनी कायझेन संकल्पनेच्या वापरामुळे व्यवसायात कसा सकारात्मक बदल झाला याबाबत सविस्तर माहिती दिली. तर मलेशियाच्या एमएएचएसए विद्यापीठाच्या प्रा. डॉ. चित्रा लथा रामलिंगम यांनी सध्या शिक्षण क्षेत्र हे महत्वपूर्ण बदलाच्या वळणावर असून नवकल्पनांच्या समावेशासह अनुकूल आणि कालसापेक्ष शिक्षण प्रणालीच्या निर्मितीसाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद केले. या दोन दिवसीय परिषदेत भारतासह ओमान, मलेशिया आणि पोलंड यांसारख्या इतर देशांतील विद्यार्थी, अध्यापक यांच्यासह एकूण ४०० जण सहभागी झाले होते.
परिषदेच्या समन्वयक डॉ. वंदना मोहांती यांनी आभारप्रदर्शन केले.












