न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२३) :- आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे ११ जून रोजी आळंदीतून प्रस्थान होणार असून, २८ जूनला तो पंढरपुरात पोचणार आहे. वारीच्या वाटचालीत पुणे, सासवड, लोणंद येथे प्रत्येकी दोन दिवस मुक्काम असणार असून, फलटणला यंदा एकच दिवस मुक्काम असणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.
आषाढी वारी सोहळ्यासाठी यंदा सोहळाप्रमुख पदाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी तीन विश्वस्तांच्या जागा रिक्त आहेत. तसेच मे महिन्यांत उर्वरित तीन विश्वस्त पदाच्या जागा रिक्त होत आहेत. वारी जून महिन्यात आहे. तोपर्यंत सहाही जागांवर नेमणुका करण्याची तयारी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून सुरू आहे.
आळंदीतून पालखी ११ जूनला निघणार आहे. त्यानंतर पुण्यात १२ व १३ जूनला पोहोचेल. सासवडमध्ये १४, १५ जून, जेजुरीत १६ जून, वाल्हे १७ जून, लोणंद १८, १९ जून, तरडगाव २० जून, फलटण २१ जून, बरड २२ जून, नातेपुते २३ जून, माळशिरस २४ जून, वेळापूर २५ जून, भंडीशेगाव २६ जून, वाखरी २७ जून, पंढरपूर २८ जून, आषाढी वारी २९ जूनला आहे. उभे रिंगण चांदोबाचा लिंब (दि. २०), वाखरी (दि. २७), इसबावी पादुका (दि. २८), गोल रिंगण पुरंदवडे (दि. २४), खुडुस फाटा (दि. २५), ठाकुरबुवाची समाधी (दि. २६), बाजीराव विहीर वाखरी (दि. २७), नीरास्नान नीरा (दि. १८), वेळापूर (दि. २५) असणार आहे.












