- अन्यथा बेशिस्त वाहनांवर कारवाईचा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- गौण खनिजाची वाहतूक करताना खडी रत्यावर पडल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. त्या बाबत वाहतूकदारांनी योग्य खबरदारी घेऊन असे अपघात टाळण्यासाठी ताडपत्रीचे आच्छादन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक करू नये. वाळू, माती, मुरुम, खडी आदी गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर आच्छादन नसल्यास वाळू खडी रस्त्यावर पडत आहे. त्यावरून इतर वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच वाहनातून उडणारे धुलीकण मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांमध्ये जात असल्याने अपघात होतात.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १३३ नुसार भार क्षमतेपेक्षा अधिक माल असलेले वाहन चालविणे, ते चालविण्यास प्रवृत्त करणे किंवा ते चालविणे हा गुन्हा आहे. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात येणार असून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनचालकांनी सुचनांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.















