न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक म्हणून हिरालाल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोनवणे यांनी सोमवारी श्रावण हर्डीकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. राज्य सरकारने हर्डीकर यांच्या बदलीचे आदेश अजून काढलेले नाहीत.
सोनवणे हे २०१० च्या प्रशासकीय तुकडीतील असून, त्यांनी आदिवासी कल्याण आयुक्त म्हणून नाशिक येथे काम केले आहे. त्यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी मुंबईत कोकण विभागीय आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
मुंबई शहराचे मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबईचेच अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. हर्डीकर यांची २०२१ मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते.
नोंदणी महानिरीक्षक म्हणून काम करत असताना हर्डीकर यांनी या विभागात अनेक बदल घडवून आणले. त्यात ई रजिस्ट्रेशन ही प्रणाली सुरू केली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. दस्त नोंदणी करताना दस्ताला नकाशा जोडण्याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी एका समितीची स्थापनाही केली होती.















