न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पिंपरीतील मोरवाडी कोर्ट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी कोर्ट न्यायाधीश एन. आर. गजभिये तर प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे होते.
अॅड. अनभुले म्हणाले, डॉ. बाबासाहेब अत्यंत गरिबीतून वर आले व त्यांच्या पत्नीने ही त्यांना साथ दिली. कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान भारतीय परीप्रेक्ष्यात कुठे कमी पडतेय हे शोधून त्याला बुद्धाच्या तत्वज्ञानाची जोड देऊन परिपूर्ण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. भांडवलदारांची हुकूमशाही मोडून काढून त्याऐवजी कामगारांच्या हिताची धोरणे असावीत यासाठी त्यांनी शांततेच्या मार्गाचा आग्रह धरला. घटनेतील तिसऱ्या भागातील मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्ष कायद्यात त्यांना हवी होती परंतु तसे झाले नाही त्यामुळे त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोर्टातही जाता येत नाही.
अॅड. सचिन गोडांबे यांनी रमाई सारखीच साथ सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंना तर लक्ष्मीबाई यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिली. महात्मा फुलेंनी त्या काळात मोफत व सक्तीच्या सरकारी शिक्षणाचा आग्रह धरला होता. परंतु भरमसाठ कर भरून आजही आपल्याला केजी ते पीजी शिक्षण सरकारी, मोफत व दर्जेदार शाळांतून मिळत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला. परंतु आपण शिकून संघटित झालेलो नाहीत व या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष तर खूपच कमी जण करत आहेत. शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांनी कधी कोणत्या जातीचा द्वेष केला नाही. मनुस्मृती जाळताना ही काही ब्राह्मण बाबासाहेबांच्या सोबत होते व त्यांनी दुसरे लग्न हे एका ब्राह्मण महिलेसोबत केले. शिवाजी राजांनी ही दुसऱ्या शाक्तपंथीय राज्याभिषेकावेळी २४ सप्टेंबर १६७४ ला एका अस्पृश्य स्त्री शी शैवविवाह करून आंतरजातीय विवाह करणारे जगातील पहिले राजे ठरले. आपल्या हयातीत एक घटना (मनुस्मृती) जाळणारे व दुसरी घटना (संविधान) निर्माण करणारे बाबासाहेब खरे समाज क्रांतीकारक होते. परंतु गेली काही वर्षे आधार सारख्या संविधान विरोधी योजना राबवून संविधानातील विविध तरतुदी मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. खासगीकरण हे संविधान विरोधी व आरक्षण व्यवस्था संपविणारे धोरण आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचा विरोध केला पाहिजे. गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असा मोठा संदेश बाबासाहेबानी आपल्याला दिला. परंतु सध्याची शिक्षण व्यवस्था मानसिक गुलामांची फौज तयार करत आहे, वैज्ञानिक दृष्टीकोन न शिकवता व चांगला माणूस घडविण्याचे शिक्षण न देता मनुवादी शिक्षण दिले जात आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड बारचे अध्यक्ष अॅड नारायण रसाळ, उपाध्यक्ष अॅड. जयश्री कुटे, अॅड रमेश महाजन, अॅड गणेश शिंदे, अॅड मोनिका गाढवे, अॅड मनीषा महाजन यांनी केले. महिला सचिव अॅड प्रमिला गाडे यांनी सूत्रसंचालन केले तर अॅड नितीन कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. असंख्य वकील व इतर नागरिक यावेळी उपस्थित होते.


















