न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्य स्थापनादिना निमित्त गुरुवारी (दि. २०) रोजी दुपारी एक दिवसीय बत्तिसाव्या श्रम – उद्योग परिषदेचे ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, कष्टकरी संघर्ष महासंघ-महाराष्ट्र आणि आशिया मानवशक्ती विकास संस्था आयोजित श्रम-उद्योग परिषदेचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस आणि कामगार कायद्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक चंदन कुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्यवाह उद्धव कानडे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. विनाशुल्क या परिषदेचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदाम भोरे व आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव सातपुते यांनी केले आहे.


















