न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- पिंपरी- चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाकरिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व मैदानी चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पूनम वसंत रोकडे ही महिला उमेदवार सर्वाधिक १४० गुण प्राप्त करत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिला मैदानी चाचणीत ४७ तर लेखी परीक्षेत ९३ गुण असे एकूण १४० गुण मिळाले आहेत. पोलीस आयुक्तालयानेदेखील तिच्या या यशाची दखल घेत, तिचे अभिनंदन केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाच्या २१६ पदाच्या सरळसेवा भरतीकरिता प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये शारिरीक व मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या सर्व चाचण्या व लेखी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. १३) आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये २१६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तर १३५ उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली ही तात्पुरती यादी असून, या निवड यादीमधील सर्व उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी होणे बाकी आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सहा शासकीय निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नूतन देवकर, समाजकल्याण अधिकारी मदन वाघमारे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी (घोडेगाव) श्रीकांत माने व पोलीस निरीक्षक बड़ेसाब नाईकवाडे यांचा निवड मंडळात समावेश होता.


















