- महापालिकेत ‘संवाद व्यावसायिकांशी’ कार्यक्रमात आयुक्तांचे स्पष्टीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२३) :- शहराच्या विकासामध्ये हॉटेल व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असून, पिंपरी- चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे राबवावे, हॉटेलला शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यात येईल. हॉटेलच्या परिसरात असलेल्या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
महापालिकेत ‘संवाद व्यावसायिकांशी’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख रविकिरण घोडके, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्यासह पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाथ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष रमेश पाटके, उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी, सचिव सतीश तेलंग, गिरीश शेट्टी, किरण सुवर्णा, शंकर चक्रवती उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले. तसेच काही प्रश्न देखील उपस्थित केले. आयुक्त सिंह यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. हॉटेल व्यवसायामध्ये ट्रान्सजेन्डर समूहातील नागरिकांना सामावून घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असोसिएशनच्या वतीने मांडला.















