न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- अजित पवार यांचे सुपुत्र व पक्षनेते शरद पवार याचे नातू व मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार शुभारंभ नुकताच चिंचवड येथे पार पडला.
शुभारंभ सभेत भाषण करताना पार्थ पवार यांची चांगलीच दमछाक झाली. अगदी मोजक्याच शब्दात मावळचा विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. परंतू, विरोधक आणि प्रसार माध्यमांनी त्यांच्या कमी बोलण्याचा अन् भाषणाचा सडकून समाचार घेतला. सोशल मिडीयावरही पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडवण्यात आली.
वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना, मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या संयुक्त वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि प्रचाराचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पार्थने सांगितले की, ”ते माझं पहिलचं भाषण होते.. एक दोन चुका झाल्यात. काही लोकं जास्त बोलतात आणि काम कमी करतात. पण माझी पध्दत वेगळी आहे. मी कमी बोलतो पण काम जास्त करणारा आहे”.
एकंदरीत पार्थने कितीही सारवासारव केली, तरी त्यांना आजून बराच लांबचा पल्ला गाठायचा असून, त्यासाठी त्यांनी आणखी तयारी करणे आवश्यक आहे, अन्यथा कितीही अनुकूल परिस्थिती असतानाही भल्या भल्यांना या वादळात घाम फुटल्याशिवाय राहत नाही.











